अमळनेर-धुळे महामार्गावर भीषण तिहेरी अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू, साखरपुड्याचा आनंद क्षणात शोकात

0

अमळनेर-धुळे महामार्गावरील मंगरूळ गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. भरधाव कार, मोटरसायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक लहान मुलगा थोडक्यात बचावला. या दुर्दैवी घटनेमुळे एका कुटुंबाचा साखरपुड्याचा आनंद क्षणात शोकात बदलला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजता मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात हा अपघात घडला. धुळ्याकडून येणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या एसटी बस आणि मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.

या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील पाच प्रवाशांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत सर्वजण गुजरातमधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. ते अमळनेर येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत होते. मात्र नियतीने त्यांच्यावर काळाचा घाला घातल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मृतांमध्ये आदित्य चंद्रकांत महाजन, अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन आणि सुरेश विक्रम महाजन यांचा समावेश आहे. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता.दरम्यान, कारमध्ये अडकलेल्या एका लहान मुलाला स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच एसटी बसमलीप पाटील हे प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच ‘११२’ आपत्कालीन सेवेच्या माध्यमातून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व बचावकार्य राबविण्यात आले. जखमींना ‘१०८’ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले.या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.