साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्याने ७ कामगार जखमी ; पाळधीतील घटना

0

पाळधी । जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्याने ७ कामगार जखमी झाले. ढिगार्‍याखाली अडकलेल्या कामगारांना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे ही घटना घडली. साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या भक्तनिवासामध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली दबून ७ कामगार जखमी झाले आहेत. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती प्रताप पाटील यांनी दिली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढत मदतकार्य केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जळगावच्या शासकीय रुग्णालयात हलविले. जखमी कामगारांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून समोर आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.