जळगावला अवकाळी पावसाने झोडपलं; बळीराजा चिंतेत

0

जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज मंगळवारी सायंकाळी ५वाजेच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून अन् अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जळगावकरांची तारांबळ उडाली. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

जळगाव मध्ये मागच्या तीन चार दिवसापासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या वातावरणामुळे तापमानात चढ उतार होत असून थंडीचा कडाका कमी झाला असून उकाडा जाणवत आहे. आज मंगळवारी सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहे. जळगाव शहरातील अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.या अवकाळी पावसाचा मोठा फटका शहरातील लहान विक्रेत्यांना बसला आहे. रस्त्याकडेला बसणाऱ्या फळविक्रेत्यांचे आणि कापड दुकानदारांचे पावसामुळे किरकोळ नुकसान झाले. रम्यान, हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी काही प्रमाणात नुकसानकारक ठरू शकतो, अशी चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

हवामानात अचानक बदल का झाला?
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले आहेत. या वाऱ्यांचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होत असून, त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. यामुळे हुडहुडी भरवणारी थंडी जवळपास गायब झाली असून, पुढील 24 तास राज्यात ढगाळ आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.