जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल १०३८ अर्ज दाखल
जळगाव । जळगाव महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा टप्पा मंगळवारी पूर्ण झाला असून १९ प्रभागांतील ७५ जागांसाठी यंदा एकूण १०३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे २०१८च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा अर्जाची संख्या ४२३ने वाढली. गेल्या निवडणुकीत (सन २०१८) अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत ६१५ अर्ज आले होते. मात्र, यंदा ही संख्या १०३८ वर पोहोचली आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. गेल्या अनेक दिवसांपासूनचा महायुतीचा तिढा अखेर मंगळवारी सुटला असून, जागावाटपाचे अधिकृत सूत्र जाहीर करण्यात आले आहे. भाजपला ४६ जागा, शिंदेसेना २३ तर राष्ट्रवादीला (अजित पवार) ६ जागा सोडण्यात आल्या आहेत. युतीची घोषणा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झाल्याने उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी उसळली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.


विविध पक्षांतील अनेक दिग्गज उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना, अश्रू, नाराजी आणि नेतृत्वाविरोधातील सवाल यामुळे हा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत गाजलेला ठरला.नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सर्व पक्षांकडून मिळून एकूण १०३८ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांकडे थेट कैफियत मांडली, तर काहींनी बैठकीच्या ठिकाणी जाऊन “आम्हाला तिकीट का नाही?”, “नुकतेच पक्षात आलेल्यांना तिकीट का दिले?” असे सवाल उपस्थित केले.
निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय दाखल अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे आहे — निवडणूक निर्णय अधिकारी १ : २०२ निवडणूक निर्णय अधिकारी २ : १३५ निवडणूक निर्णय अधिकारी ३ : १६० निवडणूक निर्णय अधिकारी ४ : २२२ निवडणूक निर्णय अधिकारी ५ : १८२ निवडणूक निर्णय अधिकारी ६ : १३७ एकूण अर्ज : १०३८