जळगावमध्ये शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत
जळगाव । राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले असून यात शिवसेना ठाकरे गटाला एकावर एक मोठे धक्के बसताना दिसत आहेत. आता अशातच जळगाव शहरात येत्या 1 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याने राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाच्या नाराज नगरसेवकांना सोबत घेऊन शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
विधानसभा निवडणुकांनंतर सुरू असलेल्या इनकमिंग-आऊटगोईंगच्या सिलसिलामुळे शिवसेना ठाकरे गटाला एकावर एक धक्के बसत आहेत.गेल्या काही महिन्यात ठाकरे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता जळगाव महापालिकेतील ठाकरे गटाचे चार ते पाच माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव दौऱ्यात हे नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.