जळगावच्या डॉक्टरसह तरुणाला लाखो रुपयांत गंडविले
जळगाव : जळगावात फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनिलॉड्रिंग अंतर्गत बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे खोटे भासवून जळगावातील एका डॉक्टरची तब्बल ३१ लाख ५६ हजार ६४ रुपयांत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत ऑनलाइन टाक्स गेमच्या नावे तरुणाला सायबर गुन्हेगारांनी साडेपाच लाखांचा चुना लावला आहे.
जळगाव शहरातील डॉ. डी. डी. उगले (वय ५८) यांनी सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ९ जानेवारीला ट्रायमधून राधिका नावाने महिलेचा फोन आला. त्यानंतर व्हॉट्सॲपवरून राजेश प्रधान, मुकेश बॅनर्जी यांनी संपर्क करून तुमच्या मोबाईल क्रमांकावरून महिलांशी अश्लील कृत्य करण्यात आले असून तुमच्याविरुद्ध मुंबईच्या बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबतची नोटीस पाठवून तुमच्या खात्यात २ कोटी जमा झाल्याबाबत ‘आरटीजीएस’ची खोटी पावती दाखवून भीती दाखविण्यात आली.
गुन्हा दाखल करण्याची भीती
तर तुम्हाला आता ‘मनी लॉड्रिंग’च्या गुन्ह्यात अटक करावी लागेल, अशी भीती दाखवून तब्बल ३१ लाख ५६ हजार ६४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. उगले यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या वरून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बबन अव्हाड तपास करीत आहेत.
तरुणाला साडेपाच लाखांचा चुना
तसेच धरणगाव तालुक्यातील शेरी येथील तरुणाला टेलिग्राम या सोशल मीडिया साइटवर पैसे कमावण्याचे आमिष दाखवत टास्क गेमच्या नावे तब्बल ५ लाख ३२ हजार ६८८ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. मोनिष दत्तू ठाकूर हा विद्यार्थी टेलिग्राम साइटवर ऑनलाइन टास्क गेम खेळत असताना त्याला वेगवेगळे टास्क सांगून त्याच्या बँक खात्यांची माहिती घेत खात्यातून तब्बल ५ लाख ३२ हजार ६८८ रुपये इतकी रक्कम ऑनलाइन पद्धतीने गंडविण्यात आली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.