भारताची चिंता वाढवणारी बातमी! चीनमधील HMPV व्हायरसची बंगळुरूतील आठ महिन्यांच्या चिमुकलीला लागण

0

नवी दिल्ली । कोरोनासारखा महाखतरनाक व्हायरस देणाऱ्या चीनमध्ये आता आणखी एक नवीन व्हायरस निर्माण झाला आहे. HMPV या नावाचा व्हायरस चीनमध्ये धुमाकूळ घालत असून यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे. अशातच चीनमधील HMPV व्हायरसने भारतात एंट्री केलीय. या महाखतरनाक व्हायरसची लागण बंगळुरूतील एका 8 महिन्याच्या मुलाला झाली आहे. या चिमुकलीची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती आहे.

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एका खासगी रुग्णलयाने केलेल्या चाचणीत या चिमुकलीला ह्यूमन मेटान्यूमोची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र, सरकारद्वारे अद्याप कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात बोलताना, खासगी रुग्णालयाच्या अहवालावर शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात विषाणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या अधिक्षक डॉ. वंदना बग्गा यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.

काय आहेत एचएमपीव्हीची लक्षणे?
फ्लू, खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्‍वास घ्यायला त्रास होणे, ही एचएमपीव्हीचं सामान्य लक्षणे आहेत. तसेच गंभीर स्थितीमध्ये या विषाणूमुळे ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारखे आजार उद्‍भवण्याची शक्यता आहे. संसर्गानंतर तीन ते सहा दिवसांनी याची लक्षणे आढळून येत आहेत.

या विषाणूमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण भारताच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने दिले आहे. हा विषाणू इतर श्वसन संसर्गजन्य विषाणूसारखाच आहे. यात सर्दी होते. यात लहान मुलांमध्ये तापासारखी लक्षणे दिसतात, मात्र योग्य काळजी घेतल्यास सध्याच्या परिस्थितीत घाबरण्याची काहीच गरज नसल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.