प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग अॅक्शन मोडमध्ये, थेट आदेशच काढले
आमदार सुरेश धस यांनी मराठमोळी अभिनित्री प्राजक्ता माळीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वक्तव्य करत असताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता प्राजक्ता माळीने यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर राज्य महिला आयोग अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
प्राजक्ता माळीने मुंबई पोलिस आणि बीड पोलिसांना अर्ज दिला आहे. प्राजक्ता माळी यांच्या तक्रारीवर आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार करणार आहोत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली. रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना याबद्दलचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण घटनेचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. प्राजक्त माळी हे एक निमित्त आहे. पण आज मोठ्या प्रमाणात महिलांचं चारित्र्य हनन केलं जात आहे, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘प्राजक्ता माळीचा अर्ज महिला आयोगाला प्राप्त झाला. दोन दिवसांमध्ये महिला आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ज्ञ यांनी शहानिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाला पाठवला आहे. त्याचसोबत त्याची एक प्रत बीड पोलिस अधिक्षक आणि सायबर क्राईम यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. सायबरच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल केलेल्या अश्लिल विधानांची चाचपणी व्हावी आणि कारवाई व्हावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.’
तसंच, संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंघाने कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगामध्ये काम करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तक्रारी आल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली बदनामी, अनेक कुटुंब उद्धवस्त होतात. सोशल मीडियामुळे फसवणूक आणि वाढलेल्या गुन्हेगारीची संख्या वाढली आहे. आम्ही अनेक उपाययोजना राबवत आहोत तरी त्यात काही यश आले नाही. अनेक महिला तक्रार करायला घाबरता.