लाच प्रकरणी पारोळ्याचे दोघे पोलीस कर्मचारी जाळ्यात
पारोळा । पारोळा पोलीस स्थानकात कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. हिरालाल देविदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील असं लाचखोर कर्मचाऱ्यांचे नाव असून या कारवाईने एकच खळबळ उडाली.
याबाबत असे की, पारोळा ते धरणगाव रस्त्यावर दुचाकीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सदर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्या वाहनचालकाला अटक न करण्यासाठी या पारोळा पोलीस स्थानकात कार्यरत हिरालाल देविदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील या दोन कर्मचाऱ्यांनी ३० हजार रूपयांची लाच मागितली होती. यात तडजोड होऊन १५ हजार रूपयांची लाच देण्याचे निश्चीत झाले. दरम्यान, या व्यक्तीने संबंधीत प्रकरणात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.
येथे या प्रकरणाची खातरजमा करून एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने बुधवारी १५ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना एका पोलीसाला रंगेहात अटक केली असून दुसरा मात्र फरार झाला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात हिरालाल देविदास पाटील ( वय ४३ वर्ष पारोळा पो.स्टे.रा. हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर); प्रवीण विश्वास पाटील, (वय ४५ वर्ष, रा. पोलीस लाईन, बसस्थानकाजवळ, पारोळा ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे धुळे येथील निरिक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला आणि प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली.