‘अ‍ॅडव्हान्टेज जळगाव’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित लोकसभा व विधानसभा सदस्यांचा जाहिर सत्कार समारंभ

मल्टी मीडिया फीचर्स प्रा. लि. तर्फे आयोजन

0

जळगाव । लोकशाहीच्या महान सणात मतदानाच्या हक्क बजावून संपूर्ण देश व राज्यासह जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनीही आपापल्या भागातील लोकप्रतिनिधींना आपल्या अमूल्य मतांनी निवडून दिले आहे. जनतेचा विश्वास आणि जनसेवेचे ध्येय ठेवून गल्ली ते दिल्लीपर्यंत जिल्ह्याच्या सार्वजनिक विकासाचा आवाज बुलंद करणारे तसेच जनआकांक्षा पूर्ण करणारे जिल्ह्यातून 2 लोकसभा आणि 11 विधानसभा सदस्य यांना ‘अ‍ॅडव्हान्टेज जळगाव’ या संकल्पने अंतर्गत मल्टी मीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे सार्वजनिकरित्या जाहीरपणे सन्मानित केले जात आहे.

या संदर्भात माहिती देताना सांगण्यात आले की, रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या दोन खासदार ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व श्रीमती स्मिताताई वाघ तसेच जिल्ह्यातील सर्व अकरा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार ज्यामध्ये जळगाव शहरातून श्री.सुरेश दामु भोळे, जळगाव ग्रामीणचे श्री.गुलाबराव पाटील, जामनेर येथून श्री.गिरीश महाजन, भुसावळ येथील श्री.संजय सावकारे, चोपडा येथून प्रा.श्री.चंद्रकांत सोनवणे, रावेरचे श्री.अमोल जावळे, पारोळ्याचे श्री.अमोल पाटील, चाळीसगाव येथील श्री.मंगेश चव्हाण, अमळनेर येथील श्री.अनिल पाटील, पाचोरा येथील श्री.किशोर पाटील आणि मुक्ताईनगर येथील श्री.चंद्रकांत पाटील या सर्व तेरा लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार समारंभ शनिवार, दि. 7 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता शहरातील महाबळ रोडवरील छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकूल येथे जिल्ह्यातील जनता जनार्दन यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या दिमाखदार सत्कार समारंभात सर्व लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघातील प्रादेशिक विकास आराखड्यांचा विचार प्राधान्याने ठेवतील आणि यानिमित्ताने त्यांच्या ‘व्हिजन डॉक्यमुेंट’च्या माध्यमातून आगामी पंचवार्षिक विकास कामांना प्राधान्य देतील.

हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला व नि:शुल्क असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या सत्कार समारंभाची शोभा वाढवावी, असे आवाहन सत्कार समारंभाचे आयोजक मल्टी मीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे करण्यात आले आहे.

मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि द्वारे गत दहा वर्षांपासून ‘अ‍ॅडव्हान्टेज जळगाव’ या संकल्पनेतून स्थानिक व्यवसाय, सार्वजनिक विकास आणि सामाजिक विषयांशी संबंधित विविध उपक्रम वेळोवेळी करण्यात आले आहेत, हे विशेष!

Leave A Reply

Your email address will not be published.