अंगावर वीज पडून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू
सोयगाव तालुक्यातील हनुमतखेडा येथे शेतातून घरी जाताना १४ वर्षीय मुलीच्या अंगावर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आश्विनी मच्छिंद्र राठोड (वय. १४, रा हनुमंतखेडा) अशी मृतकाची नाव असून याबाबत बनोटी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हनुमंतखेडा येथील परिवार आई, वडील, २ बहीण आणि भाऊ असे पाचही जण हनुमंतखेडा शिवारातील गट क्रमांक १२९ मध्ये कापुस वेचताना अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आई, वडील व मुलांनी घरचा रस्ता धरला.
घराकडे येतांना आश्विनी सर्वात पुढे होती आणि आई, वडील, भाऊ, बहीण चालत असतांना अचानकपणे वीज पडली. यात अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने यात आई, वडील, भाऊ आणि बहीण यांना कुठलीही इजा पोहचली नाही. अश्विनी हिला बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता आरोग्य अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. बनोटी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. बनोटी दुरक्षेत्रात घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.