पाचोरा येथील बीएसएफच्या जवानास वीरमरण
पाचोरा । सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेला जवान चेतन हजारे यास देशसेवा बजावताना 15 जून रोजी रात्री 10 वाजता वीरमरण आल्याची दुःखद घटना घडली. दरम्यान, या घटनेने शहीद जवान हजारे यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाचोरा शहरातील देशमुखवाडी भागातील रहिवासी असलेला चेतन हजारे (वय, 29 वर्ष) हा विवाहित तरुण मिझोराम येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होता. देशसेवा बजावताना 15 जून शनिवार रोजी रात्री 10 वाजता त्यास वीरमरण आले. सुमारे 10 वर्ष त्याने देशसेवा बजावल्याची माहित हाती आली आहे. त्याचे पश्चात आई, वडील, एक बहीण, जावई, पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
वीर जवानावर उद्या होणार अंत्यसंस्कार –
वीर जवान हजारे या जवानाचे पार्थिव उद्या, 17 जून रोजी सकाळी 6 वाजता त्यांचे पार्थिव पाचोरा शहरातील देशमुख वाडी येथे आणले जाणार आहे. यानंतर सकाळी 9 वाजता त्याचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने पाचोरा शहरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.