जळगावातील ज्वेलर्सवरील दरोड्याची उकल; पुण्यातून संशयित ताब्यात
जळगाव । सराफ बाजारातील भवानीमाता मंदिरासमोरील सौरभ ज्वेलर्स दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी फोडून ३२ लाख २९ हजार ५७४ रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या प्रकरणी पोलिस पथकाने पुण्यातून संशयिताला ताब्यात घेतले आहे, तर इतर तिघांची चौकशी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक संदीप गावित यांनी घटनास्थळांची पाहणी करून पथके नियुक्त केली. काही तासांतच गुन्हे शाखेसह एका संयुक्त पथकाला पुण्याला पाठविण्यात आले. पुण्यातून एकाला पथकाने ताब्यात घेतले. दुसऱ्या पथकाने तिघांची चौकशी सुरू केली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून जानेवारीत केलेल्या लुटीचे धागेदोरेही गवसणार आहेत.
सराफ बाजाराची सुरक्षा व्यवस्था तोकड्या स्वरुपात आहे. नेहमी मोठी घटना घडली, की पोलिस अधिकारी सराफ असोसिएशनची बैठक घेऊन सूचना देतात. नंतर ‘पुन्हा पहिले पाढे पच्चावन्न’, असा प्रकार घडतो.
सराफ बाजारात सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही आणि अलार्म सिस्टीमबाबत सूचना करण्यात येणार आहेत. सोबतच पोलिस गस्तही वाढवली जाणार आहे. दाखल दरोड्याच्या गुन्ह्याच्या तपास योग्य दिशेने सुरू असून, सध्या तरी काही सांगता येणार नाही, असे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.