कडाक्याच्या थंडीला ब्रेक! जळगावमध्ये तापमानाचा पारा ८ वरून थेट १७ वर
गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा जोर आता काहीसा कमी झाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात अचानक मोठी वाढ झाली असून, अवघ्या दोन दिवसांत पारा तब्बल ९ अंश सेल्सिअसने वर गेला आहे. त्यामुळे सकाळच्या बोचऱ्या थंडीपासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

२० ते २२ नोव्हेंबरदरम्यान भुसावळचे किमान तापमान ८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. त्यामुळे पहाटेच्या वेळी हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत होती. मात्र, त्यानंतर वातावरणात अचानक बदल झाला. २३ नोव्हेंबरला किमान तापमान १३.२ अंशांवर पोहोचले. त्यात आणखी वाढ होत मंगळवारी पारा १७ अंश सेल्सिअसवर स्थिरावला.


अवघ्या ४८ तासांच्या कालावधीत किमान तापमानात झालेली ही मोठी वाढ हवामानातील बदलाचे संकेत मानली जात आहे. त्यामुळे सध्या दिवसा उन्हाची उब जाणवत असून, रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र काही प्रमाणात गारवा कायम आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस जिल्ह्यातील किमान तापमान १४ ते १७ अंश, तर कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या काळात पावसाची शक्यता नसून हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
सकाळच्या वेळी काही ठिकाणी हलके धुके दिसू शकते. मात्र, सूर्य वर येताच धुक्याचे प्रमाण कमी होईल. दरम्यान, २८ नोव्हेंबरनंतर बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून, त्यानंतर आकाश निरभ्र होत पुन्हा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या थंडीपासून मिळालेला दिलासा काही दिवसांचाच ठरण्याची शक्यता आहे.