भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदासाठी मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी
नाशिक येथे एस.एस.बी. प्रशिक्षण वर्ग ; इच्छुक उमेदवारांच्या १ डिसेंबरला मुलाखती

जळगाव | भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे एस.एस.बी. प्रशिक्षण वर्ग क्र. ६८ आयोजित करण्यात येत आहे. हा प्रशिक्षण वर्ग १४ ते २३ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे.


या प्रशिक्षण वर्गासाठी जळगाव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १ डिसेंबर २०२६ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे घेण्यात येणार आहेत. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीत निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन, नॅशनल डिफेन्स अकॅडमी किंवा एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट परीक्षा उत्तीर्ण होऊन एस.एस.बी. मुलाखतीस पात्र असावे, एनसीसी स्पेशल एन्ट्री, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स किंवा युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीमसाठी एस.एस.बी. मुलाखतीचे कॉल लेटर असावे अथवा एस.एस.बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे, यापैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. संबंधित पात्रता प्रमाणपत्र मुलाखतीवेळी सोबत आणावे.
इच्छुक उमेदवारांनी पुणे येथील सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील डीडब्ल्यूएस पोर्टलमधील रिसोर्सेस – पीसीटीसी नाशिक – एसएसबी ६८ या पर्यायातून आवश्यक परिशिष्टांची प्रत घेऊन ती पूर्ण भरून मुलाखतीवेळी सोबत आणावी.
अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर किंवा ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच व्हॉट्सॲप क्रमांक ९१५६०७३३०६ वर संपर्क साधावा. जळगाव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.