तीन दिवसांत सोन्याचे दर ५ हजारांनी, चांदी १० हजारांनी स्वस्त, जळगाव सराफ बाजारात आजचे दर काय?

0

जळगाव । गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ सुरू असून, ग्राहकांना दररोज बदलणाऱ्या भावांचा सामना करावा लागत आहे. अशातच आज शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी जळगावच्या सराफ बाजारातून ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्याचे दर स्थिर राहिले असून, चांदीच्या दरात पुन्हा एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात बुधवारी (ता. ११) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४१ हजार ५०० रुपये (विनाजीएसटी) होता. मात्र, गुरुवारी (ता. १२) बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची घसरण झाली आणि भाव १ लाख ३९ हजार रुपयांवर आले. त्यानंतर शुक्रवारी (ता. १३) पुन्हा अडीच हजार रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचा भाव १ लाख ३६ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. आज शनिवारीही सोन्याचे दर याच पातळीवर स्थिर आहेत.

चांदीच्या दरात घसरणीचे सत्र कायम

सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात मात्र घसरणीचा वेग कायम आहे. बुधवारी प्रतिकिलो १ लाख ९० हजार रुपये असलेल्या चांदीच्या दरात गुरुवारी तब्बल पाच हजार रुपयांची घट झाली आणि भाव १ लाख ८५ हजारांवर आले. शुक्रवारी आणखी चार हजार रुपयांची घसरण झाल्याने चांदी १ लाख ८१ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. आज शनिवारी पुन्हा एक हजार रुपयांची घट झाली असून, चांदीचा भाव आता १ लाख ८० हजार रुपये प्रतिकिलो झाला आहे.

सोने-चांदी खरेदीपूर्वी आजचे दर जाणून घ्या

गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात एकूण पाच हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात बुधवारीच्या तुलनेत तब्बल दहा हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सध्या सराफ बाजारातील दरांवर ग्राहकांचे विशेष लक्ष लागले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि मागणी-पुरवठ्यानुसार सोन्या-चांदीच्या दरात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.