जळगावकरांनो, हवामानाचा लहरीपणा वाढला! ५ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण
जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या हवामानाचे दुहेरी रूप पाहायला मिळत आहे. दिवसा कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्हाचा चटका जाणवत आहे. दुसरीकडे पहाटेच्या वेळी थंडीचा गारवाही अनुभवायला मिळत असल्याने जळगावकरांना बदलत्या हवामानाचा अनुभव येत आहे. दरम्यान, येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामानातील या बदलामागे चक्रीवादळाचे उरलेले अवशेष कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अवशेषांना आता ‘मुरासू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काहीशी बळकटी मिळाली आहे. परिणामी वातावरणात बदल होऊन जिल्ह्यात ढगाळ स्थिती निर्माण झाली आहे. याच प्रभावातून काही भागांत हलक्या पावसाच्या तुरळक सरीही कोसळत आहेत.


मुसळधार पावसाची शक्यता नाही
या हवामान प्रणालीचा जळगाव जिल्ह्यावर फार मोठा प्रभाव पडणार नसल्याचे हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवस जिल्ह्यात प्रामुख्याने अंशतः ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, मुसळधार किंवा मोठ्या पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसा उकाडा, पहाटे थंडीचा अनुभव
सध्या जळगावमध्ये दिवसा उन्हाचा चटका आणि पहाटे थंडीचा गारवा असे परस्परविरोधी वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे हवामानात वारंवार बदल होत आहेत. दिवाळीच्या काळातच वातावरणात झालेल्या या बदलामुळे नागरिकांचे लक्ष हवामानाच्या अंदाजाकडे लागले आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, त्यानंतर हवामानात काय बदल होतो, याकडे जळगावकरांचे लक्ष असेल.