यावलमध्ये संशयाचे थरारक हत्याकांड! २० वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून; पती पोलिसांच्या ताब्यात!

0

जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात पतीने संशयातून पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. आयेशा नगर परिसरातील तिरुपती नगर येथे घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फरदीन खान आरिफ खान (वय २१) आणि त्याची पत्नी मशीराबी फरदीन खान (वय २०) हे तिरुपती नगरातील घरात राहत होते. सोमवारी कुटुंबातील इतर सदस्य लग्नसमारंभासाठी बाहेर गेले असताना पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या फरदीनने पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा आवळला. यात मशीराबी यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी फरदीन घरातून फरार झाला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या फरदीनला साकळी गावाजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अवघ्या वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याच्या संसाराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.