जळगावच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू; कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

0

जळगाव । जळगाव शहरातील महाबळ परिसरात वास्तव्यास असलेल्या अरविंद शामराव पाटील (वय ४५) या कंपनी कामगाराचा कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना आज मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील हे पाळधी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्नेहल इंडस्ट्रीज या कंपनीत गेल्या काही वर्षांपासून काम करत होते. ते जळगाव शहरातील महाबळ परिसरात वास्तव्यास होते. आज मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर जाण्यासाठी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घरातून निघाले होते. दरम्यान, कंपनीबाहेरील एका झाडाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. सकाळी कामासाठी कंपनीत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवून उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अरविंद पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.