पाळधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीदरम्यान भीषण दुर्घटना; क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू!

0

जळगाव : जळगाव-पाळधी-तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना साईड गर्डर उचलणारी क्रेन तब्बल ५० ते ६० फूट उंचीवरून खाली कोसळली. या भीषण दुर्घटनेत क्रेन चालक मधुकर धनराज पाटील (वय ४४, रा. वंजारी खपाट, ता. धरणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गावाजवळील रेल्वे मार्गावर असलेल्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामांतर्गत क्रेनच्या साहाय्याने साईड गर्डरचा मोठा भाग उचलला जात होता. त्याचवेळी क्रेनचा तोल जाऊन ती सुमारे ५० ते ६० फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत चालक मधुकर पाटील यांचा मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अडीच महिन्यांपूर्वीही खचला होता पुलाचा भाग

पाळधी-तरसोद बायपासवरील उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत यापूर्वीही स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अडीच महिन्यांपूर्वी या परिसरातील उड्डाणपुलाचा काही भाग आणि भराव खचल्याची घटना घडली होती. त्यानंतर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. या घटनेनंतर पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबरोबरच वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली होती. आता दुरुस्तीचे काम सुरू असतानाच क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याने या मार्गावरील कामाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

तीन महिन्यांपासून एकेरी वाहतूक

पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या तीन महिन्यांपासून या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. पाळधी ते तरसोद बायपास हा जळगाव परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असून, दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, दुरुस्तीचे काम लांबल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडी, प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि अपघातांचा धोका अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

शहरातील वाहतुकीवरही ताण

बायपासवरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याने अनेक वाहनांना जळगाव शहरातून वळसा घालून जावे लागत आहे. परिणामी, शहरातील वाहतुकीवरही ताण वाढला आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीत शहरातून वळवलेल्या वाहतुकीदरम्यान जवळपास १३ जणांचा अपघातांत मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे बायपासवरील दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करणे, वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे अधोरेखित होत आहे.

पाळधी-तरसोद बायपासवरील या दुर्घटनेमुळे उड्डाणपुलाच्या बांधकामाचा दर्जा, दुरुस्तीच्या कामातील सुरक्षितता आणि वाहतूक नियोजनाबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.