राज्यात पावसाने दडी मारली त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस पडला नाही त्यामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. सर्वजण पावसाची वाट पाहत आहेत. अशातच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. हवामान खात्याने राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वादळी वाऱ्यासह या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पाऊसाचा धुमाकूळ सुरू आहे. अशात पुढचे काही तास या सर्व जिल्ह्यांसाठी महत्वाचे राहणार आहेत. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील ४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसंच, राज्यातील इतर २० जिल्ह्यांमध्येही पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. पुढील ४८ तास राज्यासाठी महत्वाचे असणार आहे. अनेक जिल्ह्यात वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क रहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचाऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर हिंगोली, नांदेड, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर जालना, बीड, धाराशिव येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भ, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.