वैजापूर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून आता पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. संभाजीनगरच्या वैजापूर येथे समृद्धी महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झाला असून यात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व प्रवासी बुलढाण्याहून सैलानी बाबांचं दर्शन घेऊन येत होते. या अपघातात 23 प्रवाशी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
एका 11 वर्षाच्या लहान मुलाने या अपघाताची माहिती दिली आहे. हा मुलगा या बसमधून प्रवास करत होता. त्याचा भाऊ आणि आईवडील त्याच्यासोबत होते. साधारण रात्री 12.30 नंतर हा अपघात झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. आमची बस चालली होती. आमच्यामागे ट्रक होता. ट्रकच्या मागे एक आरटीओची गाडी येत होती. ही आरटीओची गाडी ट्रकचा पिच्छा करत होती.
त्यानंतर ट्रकने वेग वाढवला आणि आमच्या बसला ओव्हरटेक केलं. ट्रक पुढे गेला. त्यानंतर आरटीओची जीपही पुढे गेली. हा प्रकार माझ्या भावाने मला दाखवला. पण पुढच्याचवेळी आणखी एक जीप थेट ट्रकच्यासमोर आडवी झाली. त्यामुळे ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबला आणि ट्रक गचकन थांबली. ट्रक थांबताच आमची पाठीमागून येणारी बस थेट या ट्रकवर जाऊन आदळली आणि अपघात झाला, असं या मुलाने सांगितलं.