पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
जिल्ह्यातील 7,316 शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत सामावेश

जळगाव । महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयाद्वारे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ जाहीर केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत पहिली यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी या योजनेची शेतकऱ्यांची दुसरी यादी शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे.


त्यानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जळगाव या बँकेचे 5,399 शेतकरी व इतर राष्ट्रीयकृत बँकांचे 1,917 शेतकरी, असे एकूण 7,316 शेतकऱ्यांचा समावेश दुसऱ्या यादीत करण्यात आलेला आहे. यानंतर देखील या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्पेनिहाय जाहीर करण्यात येणार आहेत.
या याद्या संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच बँकांच्या सर्व शाखांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तरी संबंधित यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण तात्काळ करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था महेशकुमार गायकवाड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.