बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ
जळगाव गणेशोत्सवासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून तब्बल ४७ हजार रुपये खर्च करून आणलेली १२ फूट उंच गणेशमूर्ती जळगावला येतानाच दुभंगल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी पेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी झाकून ठेवलेली मूर्ती उघडून पाहिल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मूर्तिकाराने पूर्ण रक्कम घेतल्यानंतरही मूर्तीचे काम व्यवस्थित पूर्ण केले नसून, घाईघाईने ओली मूर्ती मंडळाच्या ताब्यात दिल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
जय महाराष्ट्र मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी बऱ्हाणपूर येथून १२ फूट उंचीची गणेशमूर्ती तयार करून घेतली होती. त्यासाठी मंडळाने मूर्तिकाराला सुमारे ४७ हजार रुपये दिल्याचे सांगण्यात आले. गणेशमूर्ती जळगावकडे आणली जात असताना वाटेतच ती दुभंगली. मात्र, मूर्ती झाकलेली असल्याने हा प्रकार तत्काळ मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला नाही.
मूर्ती उघडताच कार्यकर्त्यांना धक्का
गुरुवारी सायंकाळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीवरील आवरण काढून पाहिले. त्यावेळी गणेशमूर्ती दुभंगल्याचे दिसून आले. मूर्तीची अवस्था पाहून कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने मोठ्या उत्साहाने आणलेल्या मूर्तीची अशी अवस्था झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मूर्तिकाराने मूर्तीचे काम पूर्ण करण्यापूर्वीच ती मंडळाच्या ताब्यात दिली. मूर्ती पूर्णपणे वाळलेली नसतानाच घाईघाईने ती सोपविण्यात आल्याचा आरोप मंडळाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीदरम्यान मूर्तीवर ताण येऊन ती दुभंगली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्ण पैसे देऊनही अपेक्षेप्रमाणे मूर्ती तयार करून न दिल्याने मंडळाची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरण गणेश मूर्तीशी संबंधित असल्याने या प्रकारामुळे कार्यकर्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचीही भावना मंडळाने व्यक्त केली. मंडळाचे पदाधिकारी भूषण जोशी यांनी माध्यमांशी बोलताना, मूर्तिकाराने पूर्ण पैसे घेतले असूनही काम व्यवस्थित केले नसल्याचा आरोप केला. ओली मूर्ती घाईघाईने जळगावला पाठविण्यात आल्याने ती वाटेत दुभंगली. या प्रकारामुळे मंडळाची आर्थिक तसेच मानसिक फसवणूक झाली असून, आमच्या भावनाही दुखावल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
