शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मिळणार अनुदान; महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव । राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान-पोषक तृणधान्य उपअभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत रब्बी हंगाम सन २०२६-२७ मध्ये विविध बाबींसाठी अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान-पोषक तृणधान्य उपअभियानांतर्गत रब्बी ज्वारी पिकासाठी पीक प्रात्यक्षिकास प्रति हेक्टर ७ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार असून, त्यासाठी ३ हजार ६१० हेक्टरचा भौतिक लक्षांक प्राप्त झाला आहे. तसेच प्रमाणित बियाणे वितरणासाठी १० वर्षांच्या आतील वाणांना प्रति क्विंटल ३ हजार रुपये अनुदानाप्रमाणे १ हजार ४५० क्विंटल आणि १० वर्षांवरील वाणांना प्रति क्विंटल १ हजार ५०० रुपये अनुदानाप्रमाणे १ हजार २१० क्विंटलचा भौतिक लक्षांक प्राप्त झाला आहे.


कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत रब्बी हंगामात हरभरा व मसूर पिकासाठी पीक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरणाच्या बाबी राबविण्यात येणार आहेत. हरभरा पिकासाठी पीक प्रात्यक्षिकास प्रति हेक्टर १० हजार रुपये अनुदानाप्रमाणे १८० हेक्टरचा भौतिक लक्षांक आहे. प्रमाणित बियाणे वितरणामध्ये ५ वर्षांच्या आतील वाणांना प्रति क्विंटल ६ हजार रुपये अनुदानाप्रमाणे १ हजार ६४० क्विंटल, तर ५ वर्षांवरील परंतु १० वर्षांच्या आतील वाणांना प्रति क्विंटल ४ हजार रुपये अनुदानाप्रमाणे ३०२.५० क्विंटलचा भौतिक लक्षांक प्राप्त झाला आहे.
मसूर पिकासाठी पीक प्रात्यक्षिकास प्रति हेक्टर १० हजार रुपये अनुदानाप्रमाणे ७० हेक्टरचा भौतिक लक्षांक आहे. तसेच प्रमाणित बियाणे वितरणामध्ये ५ वर्षांच्या आतील वाणांना प्रति क्विंटल १२ हजार रुपये अनुदानाप्रमाणे १०० क्विंटल, तर ५ वर्षांवरील परंतु १० वर्षांच्या आतील वाणांना प्रति क्विंटल ६ हजार रुपये अनुदानाप्रमाणे २५ क्विंटलचा भौतिक लक्षांक प्राप्त झाला आहे.
वरील सर्व बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर ‘बियाणे’ या टाईलअंतर्गत ‘बियाणे’ घटकामध्ये रब्बी ज्वारी, हरभरा व मसूर पिकासाठी उपलब्ध बाबींकरिता अर्ज करावा.
शेतकरी गटाची नोंदणी दि. ३१ मार्च २०२६ पूर्वी झालेली असणे आवश्यक आहे. गटांची निवड महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येईल. प्रति गट कमाल २५ शेतकरी सभासदांचा समावेश राहील. तसेच प्रति गाव, प्रति पिकासाठी जास्तीत जास्त २ गटांची निवड करण्यात येईल.
लाभ घेणाऱ्या शेतकरी सभासदाकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी हमीपत्र सादर करणे बंधनकारक राहील.तरी जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.