जळगावच्या सराफ बाजारात सोनं-चांदी भावात पुन्हा मोठी वाढ
गेल्या काही दिवसांपासून नरमलेल्या सोने-चांदीच्या बाजाराने मंगळवारी अचानक दिशा बदलली. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १ हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरात तब्बल ३ हजार रुपयांची तेजी नोंदवण्यात आली आहे.

मंगळवारी बाजार सुरू होताना २४ कॅरेट सोन्याचा विनाजीएसटी प्रति तोळा भाव १ लाख ५२ हजार ५०० रुपये इतका झाला. सोमवारी हाच दर १ लाख ५१ हजार ५०० रुपये होता. म्हणजेच अवघ्या एका दिवसात सोन्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे.


चांदीनेही आज जोरदार उसळी घेतली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून चांदीचा भाव स्थिर होता. मात्र, मंगळवारी त्यात थेट ३ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे एक किलो चांदीचा विनाजीएसटी दर २ लाख ३९ हजार रुपये झाला आहे. सोमवारी चांदीचा दर २ लाख ३६ हजार रुपये होता.
घसरण थांबली, दरवाढीला सुरुवात
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू होती. त्यामुळे दर आणखी कमी होण्याच्या अपेक्षेने काही ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलली होती. मात्र, आज दोन्ही धातूंच्या दरात झालेल्या वाढीमुळे खरेदीदारांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरचे मूल्य आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यांसारख्या विविध घटकांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरावर होत असतो. त्यामुळे जळगावच्या सराफ बाजारातही गेल्या काही काळापासून दरांमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत.
आजच्या दरवाढीचा परिणाम सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर होणार आहे. विशेषतः लग्नकार्य, सणासुदी तसेच गुंतवणुकीसाठी खरेदी करणाऱ्यांना वाढलेल्या दराचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत सोने-चांदीचे भाव पुन्हा कोणती दिशा घेतात, याकडे ग्राहक आणि सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.