पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूस कारणीभूत बाबींकडे दुर्लक्ष; ठेकेदार कंपनीसह अधिकाऱ्यांवर गुन्हा
जळगाव : पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बायपासवर अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ठेकेदार कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्याने गेल्या महिनाभरापासून बायपासवरील वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली आहे.

शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू झाल्याने अपघातांचे सत्र वाढले असून, महिनाभरात झालेल्या अपघातांमध्ये तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.


या प्रकरणी ऍग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंगल, जीएम दत्ता यांच्यासह संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. बायपासवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले होते. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.