प्रयागराज-सुबेदारगंजहून मुंबईला धावणार अमृत भारत एक्सप्रेस; भुसावळला थांबा

0

भुसावळ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रयागराज आणि सुबेदारगंज येथून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे धावणाऱ्या दोन साप्ताहिक विशेष गाड्यांना आता नियमित अमृत भारत एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. या दोन्ही गाड्यांना भुसावळ स्थानकावर थांबा असल्याने जळगावसह खान्देशातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन विशेष गाड्यांचे नियमित गाड्यांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई आणि उत्तर भारतादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नियमित रेल्वेसेवेचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे.

प्रयागराज-मुंबई अमृत भारत एक्सप्रेस

प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणारी गाडी क्रमांक 04151/04152 आता 20436/20435 प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस या क्रमांकाने नियमित धावणार आहे.

गाडी क्रमांक 20436 21 ऑगस्ट 2026 पासून दर शुक्रवारी सकाळी 6.10 वाजता प्रयागराजहून सुटेल. ही गाडी शनिवारी दुपारी 3.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

परतीची गाडी क्रमांक 20435 22 ऑगस्टपासून दर शनिवारी सायंकाळी 5.20 वाजता एलटीटीहून सुटेल आणि रविवारी दुपारी 12.40 वाजता प्रयागराजला पोहोचेल.

या गाडीला सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ आणि कल्याण येथे थांबे देण्यात आले आहेत.

सुबेदारगंज-मुंबई गाडीही नियमित

सुबेदारगंज-लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणारी विशेष गाडी क्रमांक 04115/04116 आता 14121/14122 सुबेदारगंज-लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस म्हणून नियमित करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 14121 27 ऑगस्ट 2026 पासून दर गुरुवारी दुपारी 12.10 वाजता सुबेदारगंजहून रवाना होईल आणि शुक्रवारी रात्री 8.50 वाजता एलटीटीला पोहोचेल.

परतीची गाडी क्रमांक 14122 28 ऑगस्टपासून दर शुक्रवारी सकाळी 10.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल. ही गाडी रविवारी सकाळी 7.30 वाजता सुबेदारगंजला पोहोचेल.

या गाडीचा मार्ग फतेहपूर, गोविंदपुरी, भरुआ सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूटधाम कर्वी, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे असा असेल.

22 कोचची आधुनिक रचना

दोन्ही अमृत भारत एक्सप्रेसमध्ये एकूण 22 कोच असतील. त्यात 11 सामान्य श्रेणी, 8 स्लीपर, 1 पॅन्ट्री कार आणि 2 दिव्यांगजन/सामान व गार्डसह कोच असणार आहेत.

अत्याधुनिक एलएचबी कोच, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक प्रवासी सुविधांमुळे या गाड्यांमधून प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. भुसावळ स्थानकावर थांबा मिळाल्याने जळगावसह खान्देशातील प्रवाशांसाठी उत्तर भारत आणि मुंबईदरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.