कार पासिंगसाठी आरटीओच्या नावाने लाच घेणारा एजंट एसीबीच्या जाळ्यात

0

जळगाव : वाहनाचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी आरटीओतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाचा आधार घेत लाचेची मागणी करणाऱ्या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ८ हजार ५०० रुपयांची मागणी केल्यानंतर तडजोडीत ७ हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. योगेश रामभाऊ पाटील (रा. आदर्शनगर, जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ, जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तो खान्देश मोटर्स शोरूममध्ये एजंट म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

एसीबीकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे खासगी वकील असून दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांनी १ जुलै रोजी खान्देश मोटर्समधून मारुती अल्टो के-१० व्हीएक्सआय कार खरेदी केली होती. या वाहनाची तात्पुरती नोंदणी ३ ऑगस्ट रोजी योगेश पाटील याच्यामार्फत करण्यात आली होती.

यानंतर कारमध्ये हॅण्डकिट बसविल्यानंतर वाहनाचे कायमस्वरूपी पासिंग करून घेण्यासाठी तक्रारदार १२ ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयात गेले. त्यावेळी योगेश पाटील याने आरटीओ कार्यालयातील अधिकारी आणि संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यांच्या नावाने काम करून देण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर चर्चेनंतर ही रक्कम ८ हजार ५०० रुपयांवर ठरल्याचे एसीबीने सांगितले.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदारांनी १७ ऑगस्ट रोजी जळगाव येथील एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. या वेळी योगेश पाटील याने ८ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीत ७ हजार रुपये स्वीकारण्याची त्याने तयारी दर्शविली.

यानंतर एसीबीच्या पथकाने इच्छादेवी चौकातील बजाज टीव्हीएस शोरूम परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने योगेश पाटील याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, लाचेची मागणी आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने करण्यात आल्याने या प्रकरणात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता का, याचाही तपास तपास यंत्रणेकडून केला जाणार आहे. पुढील तपासात या प्रकरणातील अधिक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.