भादली स्थानकाजवळील ‘नॉन इंटरलॉकिंग’च्या कामामुळे १४ रेल्वे रद्द, अनेकांच्या मार्गात बदल

0

जळगाव । भादली ते जळगावदरम्यान सुरू असलेल्या पाचव्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी भादली स्थानकावर यार्ड पुनर्रचना आणि नव्या मार्गाची जोडणी करण्यात येणार आहे. या कामासाठी ११ व १२ ऑगस्ट रोजी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. या कालावधीत १४ महत्त्वाच्या प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या असून, दोन एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच ११ लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या तीन तासांपर्यंत विलंबाने धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भादली स्थानकावरील यार्डाची पुनर्रचना आणि पाचव्या रेल्वेमार्गाची जोडणी ही भविष्यातील रेल्वे वाहतुकीसाठी महत्त्वाची पायाभूत कामे आहेत. त्यामुळे काही काळ प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार असला, तरी भविष्यात रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत आणि कार्यक्षम होणार आहे.

या आहेत रद्द गाड्या
नंदुरबार – भुसावळ व भुसावळ – नंदुरबार पॅसेंजर, नाशिक रोड – बडनेरा विशेष व बडनेरा – नाशिक रोड विशेष, सूरत-भुसावळ व भुसावळ – सूरत एक्स्प्रेस, इगतपुरी – भुसावळ व भुसावळ – इगतपुरी मेमू, देवळाली – भुसावळ व भुसावळ – देवळाली मेमू, दादर – भुसावळ व भुसावळ – दादर विशेष, भुसावळ – कटनी आणि कटनी -भुसावळ एक्स्प्रेस.

‘अमृत भारत’ उशिराने
हिसार – हैदराबाद एक्स्प्रेस आणि अमृतसर-नांदेड एक्स्प्रेस या दोन गाड्या भुसावळ सी केबिन (कॉर्ड लाइन मार्ग) अकोला – पूर्णा अशा मार्गाने चालवण्यात येतील. १२ ऑगस्टला बंगळुरू – नवी दिल्ली एक्स्प्रेस, एलटीटी- गोरखपूर, यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन, मुंबई – आसनसोल, अमृतसर – मुंबई, गोंदिया – कोल्हापूर आणि बनारस – हडपसर अमृत भारत एक्स्प्रेस विलंबाने धावतील.

Leave A Reply

Your email address will not be published.