मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन; नदी-नाले, पूल ओलांडू नका, सतर्क राहा

0

जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नदी-नाले, ओढे आणि लहान पुलांवरील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना आणि इशाऱ्यांचे काटेकोर पालन करावे.

अतिवृष्टीच्या काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. पाण्याखाली गेलेले किंवा पाण्याचा वेग असलेले पूल, नदी-नाले, ओढे आणि रस्ते ओलांडण्याचा कोणताही प्रयत्न करू नये. अशा प्रकारचे धाडस जीवावर बेतू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकरी बांधवांनी शेतीची कामे करताना विशेष काळजी घ्यावी. वीजेचे खांब, तुटलेल्या वीजवाहिन्या, पाण्याने वेढलेले परिसर आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवून आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका, महसूल, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, आरोग्य विभाग तसेच सर्व संबंधित यंत्रणांना २४ तास सतर्क राहून नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, पोलीस किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

“संयम, सतर्कता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोणत्याही संकटावर मात करता येते. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने सज्ज असून प्रत्येक नागरिकाने स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि परिसरातील इतर नागरिकांची सुरक्षितता हीच सर्वोच्च जबाबदारी मानून आवश्यक ती खबरदारी घ्यावी,” असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.