जळगाव जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट घोषित
जळगाव । राज्यभर सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर करत जळगाव जिल्ह्यासाठी ३० जुलै रोजी रेड अलर्ट घोषित केला आहे. जिल्ह्यात दिवसभर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दिवसभर जोरदार पावसाच्या सरींसह काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच नदी-नाले, ओढे आणि पूरप्रवण भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असा इशाराही देण्यात आला आहे.


दरम्यान, विजांचा कडकडाट सुरू असताना शेतकरी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतात काम करताना झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबू नये. उघड्या मैदानात किंवा पाणथळ भागात उभे राहणे टाळून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.