अमळनेरमध्ये काळाचा घाला; खदाणीत बुडून तीन मित्रांचा दुर्दैवी अंत

0

अमळनेर | अमळनेर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोपडा रस्त्यालगत उड्डाणपुलाजवळील पाण्याने भरलेल्या खदाणीत तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दुर्घटनेत मानव बंटी रतनानी (१४), कार्तिक विकी उधवानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) या तिघांचा मृत्यू झाला. तिघेही अमळनेरमधील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास तिघे मित्र फिरण्यासाठी खदाण परिसरात गेले होते. खदाणीतील पाण्यातून चालत ते एका छोट्या उंचवट्यावर पोहोचले. त्यावेळी मोबाईलवर छायाचित्र काढत असताना एकाचा तोल जाऊन तो खोल पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा मित्र धावला, तर दोघांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिसराही पाण्यात गेला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही काही क्षणांत बुडाले.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस, स्थानिक नागरिक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. देवळी येथील दीपक मोरे यांनी धाडसाने पाण्यात उतरून तिघांनाही बाहेर काढले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. मृत मुलांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. एका क्षणातील निष्काळजीपणामुळे तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण अमळनेर शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच पाण्याने भरलेल्या धोकादायक खदाणींमध्ये नागरिकांनी, विशेषतः युवकांनी व मुलांनी जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.