एसीबीच्या झाडाझडतीने चौधरी प्रकरणात नवे धागेदोरे? सीलबंद घराची ‘इन-कॅमेरा’ तपासणी
जळगाव । लाचखोरीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेले अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी तथा जळगावचे मूळ रहिवासी किरण चौधरी यांच्या प्रकरणातील तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. नाशिक आणि जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) संयुक्त पथकाने गुरुवारी त्यांच्या जळगाव शहरातील सीलबंद निवासस्थानी गोपनीय पद्धतीने झाडाझडती घेतली. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य तपासासाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी अकोला येथे लाचखोरीप्रकरणी एसीबीने किरण चौधरी यांच्याविरोधात कारवाई केल्यानंतर जळगावातील साईप्रभा आर्केड येथील त्यांचे घर सील करण्यात आले होते. त्यानंतर सीलबंद घरात घुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात चौधरी यांच्या दोन नातेवाईकांनी घरात प्रवेश केल्याचा आरोप असून, जिल्हापेठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर घर पुन्हा सील करून तेथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.


गुरुवारी दुपारनंतर एसीबीचे विशेष पथक साईप्रभा आर्केड येथे दाखल झाले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सीलबंद घर उघडून ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती सुरू केली. संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली असून बाहेरील कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता.तपास पथकाने घरातील सर्व खोल्या, कपाटे, लॉकर, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सखोल तपासणी केली. आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही कागदपत्रे आणि इतर साहित्य तपासासाठी जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत असली, तरी याबाबत एसीबीने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
अधिकृत खुलासा अद्याप नाही
झाडाझडतीदरम्यान नेमके काय आढळले, किती कागदपत्रे किंवा साहित्य जप्त करण्यात आले, याबाबत एसीबीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र या कारवाईत तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची चर्चा सुरू असून लाचखोरी प्रकरणाचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.