ACB ने सील केलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरी चोरी, मध्यरात्री अचानक चोर घुसले अन्…
जळगावच्या गणेश कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केलेल्या घरात घुसखोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोल्यातील लाचलुचपत प्रकरणात अडकलेल्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घरात मध्यरात्री दोघांनी शिडी लावून प्रवेश केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

अकोल्यामध्ये एसीबीने किरण चौधरी यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांचं जळगावातील गणेश कॉलनीतील घर सील करण्यात आलं होतं. मध्यरात्री या बंद घरातून संशयास्पद आवाज येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आलं. यावेळी त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस आणि एसीबीचं पथक घटनास्थळी दाखल झालं.


पथकाने पाहणी केली असता घराच्या चॅनल गेटचं कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचं स्पष्ट झाले. त्यावेळी घरात शिडी लावून घुसलेलं प्रसाद नारखेडे आणि प्रवीण महाजन या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे दोघेही अकोल्यातील लाच प्रकरणातील संशयित किरण चौधरी यांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. या प्रकरणामागे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता का, घरातील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू एसीबीच्या कारवाईपूर्वी हलवण्याचा कट होता का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, चोरीचा बनाव करून घरातून महत्त्वाची कागदपत्रं आणि हिशोबाची नोंद असलेली डायरी चोरण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. या घटनेनंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस सखोलपणे करत असून, आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.