जळगाव जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’; सलग दुसऱ्या दिवशी रिपरिप

0

जळगाव । गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सोमवारपासून मान्सूनने महाराष्ट्रात वेगवान आगेकूच करत संपूर्ण राज्य व्यापायला सुरुवात केली आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाच्या सुखावह रिमझिम सरांमुळे तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे.

जळगाव जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’; सलग दुसऱ्या दिवशी रिपरिप

विशेषतः जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यात आज बुधवारी पहाटेच पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली, तर सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून जळगावकरांना कडक ऊन आणि असह्य उकाड्याचा सामना करावा लागत होता; तापमान आणि आर्द्रता वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, मंगळवारनंतर आज बुधवारीही पाऊस सक्रिय राहिल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे जूनअखेर खोळंबलेल्या शेतीकामांना आणि पेरण्यांना आता गती मिळण्याची चिन्हे असून बळीराजा सुखावला आहे.

मुंबई-पालघरला ‘रेड’, तर रत्नागिरीला ‘ऑरेंज अलर्ट’
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगर, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून, पुढील काही तासांत या भागात अत्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सूनने गाठली ‘पालघर ते वर्धा’ रेषा; उर्वरित भागात ‘येलो अलर्ट’

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनने आता पालघर ते वर्धा या पट्ट्यापर्यंत मजल मारली असून कोकण, मराठवाड्यासह महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला आहे. उर्वरित राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्राचा उर्वरित भाग, गुजरात आणि मध्य प्रदेशाच्या काही भागांत पूर्णपणे सक्रिय होईल. पावसाचा जोर पाहता नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.