मुक्ताईनगरातील ‘ड्रॉप केस’ रॅकेटवर जळगाव पोलिसांचा मोठा घाव; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
जळगाव | मुक्ताईनगर तालुक्यात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तथाकथित “ड्रॉप केस” फसवणूक रॅकेटवर जळगाव पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे. आज शुक्रवारी पहाटेच्या सत्रात तब्बल २०० पोलिसांच्या पथकाने पाच गावांमध्ये एकाच वेळी धाड टाकत मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, रोख रक्कम, दागिने, वाहने आणि इतर संशयास्पद साहित्यासह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने परिसरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर आमिष दाखवून फसवणुकीचा डाव


मुक्ताईनगरात तालुक्यातील लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्मिळ वस्तू असल्याचा बनाव करून नागरिकांना आकर्षित केले जात होते. काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, दुर्मिळ शंख, सुलेमानी दगड अशा वस्तूंच्या नावाखाली मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून लोकांना गावात बोलावले जात असे. गावात आल्यानंतर संबंधितांना बनावट वस्तू दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती. विरोध करणाऱ्यांना मारहाण करून लुटण्याबरोबरच त्यांच्या जवळ वन्यजीवांची कातडी ठेवून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
२०० पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन करून पहाटेच्या वेळी पाचही गावांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत अनेक संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली आणि विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान दोन गावठी कट्टे, जिवंत काडतुसे, मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन तसेच वन्यजीवांच्या कातड्यांसह अनेक आक्षेपार्ह वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या. काही आरोपींकडून बनावट नोटांच्या बंडलांचाही साठा जप्त करण्यात आला.
या कारवाईत फरोज राजू पवार (वय ४०, रा. मथपुरी), रामजाने रायसिंग भोसले (वय ३२, रा. हलखेडा), आक्काबाई जोगिंदर भोसले (वय ३२, रा. हलखेडा), रोहित सुरेश पवार (वय ३२, रा. मथपुरी), राजकिरण जोगिंदर भोसले, दया जोगिंदर भोसले, शिवविकास जोगिंदर भोसले, जोगिंदर राजवंती भोसले (रा. हलखेडा), गांधी तिरसिंग भोसले, विलास नरसिंगलाल पवार आणि अजय दादा पवार यांच्याविरोधात विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून २० लाख रुपये रोख रक्कम, सुमारे ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ४ किलो चांदीचे दागिने (किंमत सुमारे ८ लाख रुपये), दोन देशी कट्टे, तीन जिवंत काडतुसे, हरण, कोल्हा व सशाची कातडी, चार चारचाकी वाहने, सहा दुचाकी वाहने आणि ३० मोबाईल फोन जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ५८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईनंतर मुक्ताईनगर तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण झाला असून, अशा प्रकारच्या गुन्हेगारीविरोधात भविष्यातही कठोर मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.