जळगाव विधान परिषद: शिंदेंच्या भेटीनंतर बंड शमले; रेश्मा काळेंचा महायुतीला पाठिंबा

0

जळगाव । जळगाव विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा अखेर सुटला असून शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे नाशिकनंतर जळगावमधील बंडखोरीही थांबवण्यात महायुतीला यश आले आहे.

आज सकाळपासून संपर्काबाहेर असलेल्या रेश्मा काळे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण स्वतःचा प्रचार थांबवत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

जळगाव विधान परिषद निवडणुकीत भाजपाने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली होती. त्यामुळे महायुतीसमोर पेच निर्माण झाला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर झालेल्या चर्चेनंतर रेश्मा काळे यांनी माघार घेत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्न मार्गी लागला होता. आता जळगावमधील तिढाही सुटल्याने महायुतीच्या नेतृत्वाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या विधान परिषद निवडणुकीत जळगावमध्ये भाजपाचे संख्याबळ मजबूत असले तरी बंडखोरीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता आता दूर झाली आहे.

राज्यातील १७ विधान परिषद जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्यापैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित ११ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.