जळगावात वृद्धाची दगडाने डोके ठेचून हत्या
जळगाव । जळगाव शहरातील शामनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून कचरा वेचणाऱ्या एका ६४ वर्षीय वृद्धाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात रामानंदनगर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवून एका संशयित आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत, तर त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार आहे. या घटनने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जीवन शालीक पाथकर ऊर्फ जीवन मिस्तरी (वय ६४, मूळ रा. रोटवद, ता. जामनेर) असे या दुर्दैवी मृत वृद्धाचे नाव आहे. गेल्या १५ वर्षांपासून ते जळगावात वास्तव्यास होते. आईच्या निधनानंतर पत्नीने त्यांची साथ सोडली होती, तर मुलानेही वेगळा संसार थाटल्यामुळे जीवन मिस्तरी हे अत्यंत एकाकी जीवन जगत होते. शहरात कचरा वेचून आणि मिळेल ते काम करून ते स्वतःची कशीबशी गुजराण करत असत.


८ जून रोजी शामनगर परिसरातील रेल्वे पुलाजवळ नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.
सुरुवातीला पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. दरम्यान, मयताचा भाचा तुषार राजेंद्र सुतार याला या घटनेची माहिती मिळाली. त्याने जिल्हा रुग्णालयात जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. तुषारने त्याच्या मामासोबत राहणाऱ्या अन्य दोन संशयित व्यक्तींवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी या दिशेने तपास केला असता, क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांनी आधी जीवन यांना बेदम मारहाण केली आणि ते खाली पडल्यावर त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची क्रूर हत्या केल्याचे समोर आले.
रामानंदनगर पोलिसांची जलद कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून एका संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. एका असहाय्य आणि वृद्ध व्यक्तीची अशा प्रकारे हत्या झाल्याने जळगाव शहरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.