उत्तर महाराष्ट्रात महायुतीची डोकेदुखी वाढली; नाशिक-जळगावात बंडखोरीचे हायव्होल्टेज नाट्य!

0

जळगाव/नाशिक । उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीला आता अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय वळण मिळाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत संपली असली, तरी महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी शमवण्यात नेत्यांना अद्याप यश आलेले नाही. परिणामी, भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) वरिष्ठ नेत्यांकडून युद्धपातळीवर मनधरणीचे प्रयत्न सुरू असून, भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा यामुळे पणाला लागली आहे.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत अधिकृत माघारीची वेळ टळली असली, तरी भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी निवडणुकीतून प्रत्यक्ष माघार घ्यावी यासाठी महायुतीचे नेते आग्रही आहेत. काल मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांनी गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते तसेच प्रसाद हिरे यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली होती.

आज पुन्हा या बंडखोर नेत्यांशी सविस्तर चर्चा होणार आहे. मात्र, गोकुळ गिते सध्या पेठ तालुक्यात मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याने, ते पेठ दौऱ्यावर असताना मंत्री महाजन यांची भेट घेणार का आणि बंडखोरी मागे घेणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील बंडखोरीच्या तडजोडीवरच जळगाव निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. जळगावमध्ये कागदावर संख्याबळ अनुकूल असल्याने सहज विजयाचा दावा करणाऱ्या भाजपची चिंता आता वाढली आहे.

भाजपने येथे नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे, मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाशी संबंधित रेश्मा काळे यांनी अपक्ष बंडखोरी करत भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. त्यातच ठाकरे गट आणि इतर अपक्ष उमेदवारांनीही त्यांना पाठिंबा दिल्याने येथील लढत चुरशीची झाली आहे.बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची समजूत काढण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक बैठका घेतल्या, मात्र काळे यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या बंडखोरीमुळे महायुतीमधील अंतर्गत नाराजी आणि स्थानिक समीकरणांमधील दुरावा चव्हाट्यावर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.