जळगावच्या जागेवरून महायुतीत धुसफूस; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

0

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा तिढा अधिकच तीव्र झाला असून, जळगावची जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची चर्चा सुरू होताच शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट मुंबईकडे धाव घेतली आहे. त्यामुळे जळगावच्या जागेवरून महायुतीत मोठी राजकीय रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुती एकत्र निवडणूक लढवणार असली तरी जागांच्या वाटपावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मतभेद उघड झाले आहेत. शिवसेना सहा जागांवर ठाम असून भाजप चारच जागा सोडण्याच्या भूमिकेत असल्याने चर्चेची गाडी अडकली आहे.

जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. या जागेसाठी मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांनी उमेदवारी अर्जही घेतला आहे. मात्र, ही जागा भाजपला देण्याची शक्यता व्यक्त होताच गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी तातडीने मुंबई गाठली आहे.

यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जळगावची जागा शिवसेनेलाच देण्याची मागणी केली होती. तसेच जागा न मिळाल्यास ‘मैत्रीपूर्ण लढत’ लढण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

दरम्यान, जळगावच्या जागेचा अंतिम निर्णय आणि महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला उद्या सायंकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता मुंबईतील बैठकीकडे लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.