ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

0

जळगाव |: महाराष्ट्र शासन गृह परिवहन विभागामार्फत महाराष्ट्र राज्यांतर्गत नोंदणी कृत परवानाधारक ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी धर्मविर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थपना करण्यात आलेली आहे. मंडळ परिवहन विभागाच्या अंतर्गत असुन केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना राबविणे हा मंडळाचा मुख्य उद्देश आहे.

जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मंडळासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून, महाराष्ट्र राज्यातील परवानाधारक ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालक, अनुज्ञप्ती व बिल्लाधारक तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. मंडळाचे वार्षिक सभासद नोंदणी व ओळखपत्र शुल्क एकूण रुपये ८००/- इतके निश्चित करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत जिवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असतांना दुखापत झाल्यास रु. ५०,०००/- पर्यंत अर्थसहाय्य, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कामगार कौशल्य वृध्दी, ६५ वर्षावरील ऑटोरिक्ष / मिटर टॅक्सी परवानाधारक यांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान, नविन ऑटोरिक्षा / मिटर टॅक्सी खरेदी व गृह खरेदीसाठी कर्ज योजना, राज्यस्तरीय मंडळाने वेळोवेळी मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजना, शासनाने निर्देशित केलेल्या इतर कल्याणकारी योजना, लाक्षणीक योजना व्यतरीक्त शासनाने घोषीत केलेल्या अनुषंगीक योजना इ. राज्यस्तरीय मंडळाच्या मान्यतेनुसार इतर पूरक कल्याणकारी योजनाही वेळोवेळी राबविण्यात येणार आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे आजपर्यंत एकूण १६६ पात्र सभासदांची नोंदणी करण्यात आली असून, प्रथम सभासद म्हणून भुसावळ येथील दिपक मधुकर नाथ यांना दि. २४ एप्रिल २०२६ रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. राजेंद्र वर्मा यांच्या हस्ते सभासद ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रविण बागडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड, तसेच संबंधित विभागातील कर्मचारी व नेताजी सुभाषचंद्र बोस ऑटोरिक्षा युनियनचे पदाधिकारी प्रल्हाद सोनवणे, जब्बार शेख, प्रमोद वाणी, अशपाक शाहा, किरण दाभाडे, शेख असलम हे उपस्थीत होते.

जिल्ह्यातील सर्व पात्र ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करताना अडचण आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.