महाराष्ट्र्रावर दुहेरी संकट ! कडक उन्हाळ्यात ‘या’ भागात पावसाचा अलर्ट

0

नागपूर/मुंबई: महाराष्ट्र सध्या विचित्र हवामान संकटाचा सामना करत आहे. राज्याच्या काही भागांत सूर्य आग ओकत असतानाच, दुसरीकडे अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. प्रादेशिक हवामान विभाग, पुढील दोन दिवस विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला असून उष्णतेच्या लाटेचा इशाराही कायम ठेवला आहे.

हवामान विभागाने २९आणि ३० एप्रिल साठी विदर्भातील सर्व जिल्ह्यात उष्णतेचा “यलो अलर्ट” जारी केला आहे. तसेच २९ आणि ३० एप्रिल रोजी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊसही होऊ शकेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. यावेळी ४० ते ५० किलोमीटर प्रति तास एवढ्या गतीने वाराही बाहेर अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

जळगावातही उन्हाचा तडाखा
जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशांच्या दरम्यान स्थिर असल्याने जळगावकर अक्षरशः होरपळून निघाले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागतात, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत उष्ण वारे (लू) वाहत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.

वाढत्या उष्णतेमुळे उष्मघाताचा धोका वाढला असून रुग्णालयांमध्ये डिहायड्रेशन आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आणि दुपारच्या वेळी सावलीत राहण्याचे आवाहन केले आहे.

पाणी साठ्यावरही ‘उन्हाचा’ घाला
तीव्र उन्हामुळे जळगाव जिल्ह्यातील पाणीसाठ्यावरही परिणाम होत आहे. जळगावची जीवनवाहिनी असलेल्या हतनूर धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साठा ३ टक्क्यांनी कमी झाला आहे, ज्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.