जळगाव शहरात फिल्मी स्टाईल पाठलाग करून दोघांना केलं जेरबंद
जळगाव । जळगाव शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोन गुंडांच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. कासमवाडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि धारदार कोयता जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात दोन तरुण घातक शस्त्रे घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना १४ एप्रिल रोजी मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले.


पोलिसांनी कासमावाडी ते नेरी नाका दरम्यान असलेल्या एकता चौकातील मोकळ्या मैदानात सापळा रचला. यावेळी एका पल्सर दुचाकीवरून दोन तरुण येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस पथकाने शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.
पकडण्यात आलेल्या संशयितांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा, एक लोखंडी धारदार कोयता आणि कट्ट्याचे रिकामे मॅगझिन मिळून आले. पोलिसांनी रोहित गोपाळ कुंवर (वय २२, रा. कासमावाडी) आणि सागर रामा सोनवणे (वय २१, रा. मेहरूण परिसर) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा कट्टा, ५० हजार रुपयांची दुचाकी आणि कोयता असा एकूण ७०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.