जळगाव मनपाच्या ७ स्वीकृत नगरसेवकांची एकमताने निवड
जळगाव । जळगाव शहर महानगरपालिकेच्या ७ स्वीकृत नगरसेवक पदांचा पेच अखेर सुटला असून आज १५ एप्रिल रोजी पार पडलेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय संमतीने सातही उमेदवारांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर महानगरपालिका परिसरात ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
महासभेत पीठासीन अधिकारी तथा महापौर दीपमाला काळे यांनी नवीन स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची अधिकृत घोषणा केली. भारतीय जनता पक्षाकडून डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, प्रदीप रोटे आणि सुभाष शौचे यांची निवड करण्यात आली. तसेच शिवसेना (शिंदे गट)कडून हर्षल मावळे आणि नरेंद्र आत्माराम पाटील, तर शिवसेना (ठाकरे गट)कडून महानगरप्रमुख शरद तायडे यांना संधी देण्यात आली.


निवडीनंतर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी नवनियुक्त सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या महासभेला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगर सचिव सतीश शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान, या निवडीनंतर महानगरपालिकेतील पक्षीय संख्याबळातही वाढ झाली असून भाजपची संख्या ५० वर पोहोचली आहे. शिवसेनेची संख्या २५ तर शिवसेना ठाकरे गटाची संख्या ७ झाली आहे. त्यामुळे आता महापालिकेत एकूण नगरसेवकांची संख्या ८२ झाली आहे.
महासभेनंतर नवनियुक्त नगरसेवकांच्या समर्थकांनी पालिका परिसरात मोठी गर्दी करत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी नवनियुक्त सदस्यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.