जळगावात पाहुणी बनून आली अन् दागिन्यांवर डल्ला; गुन्हा दाखल
जळगाव : दोन दिवसांसाठी पाहुणे म्हणून आलेल्या एका महिलेने घरातील विश्वासाचा गैरफायदा घेत ९७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शिवकॉलनी परिसरात घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शिवकॉलनीतील रहिवासी दीपिका संदीप पाटील (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मावशीचे चुलत जावई हर्षल संजय वाघ (रा. लोहगाव, ता. शिंदखेडा) यांनी २०२२ साली नाशिक येथील नोटप्रेसमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १४ लाख रुपये घेतले होते. मात्र, नोकरी न लावल्याने दीपिका पाटील यांनी पैसे परत करण्याची मागणी केली.


यासाठी ४ एप्रिल रोजी त्या शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे वाघ यांच्या घरी गेल्या. त्या वेळी हर्षल वाघ घरी नसल्याने त्यांच्या वडिलांनी दीपिका यांना दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. जळगावला परतताना हर्षल वाघची पत्नी अश्विनी हर्षल वाघ हीदेखील त्यांच्यासोबत आली. त्यानंतर हर्षल वाघ यांनी फोन करून आपल्या पत्नीस दोन दिवस जळगावला ठेवण्याची विनंती केली.
दरम्यान, ४ ते ६ एप्रिल दरम्यान अश्विनी वाघ ही दीपिका पाटील यांच्या घरी राहिली. ६ एप्रिल रोजी दीपिका पाटील या थेरेपीसाठी बाहेर गेल्या असताना अश्विनी वाघ हिने घरातील ५ ग्रॅमची सोन्याची पोत, ४ व २ ग्रॅम अशा दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदीची चेन आणि चांदीची अंगठी असे एकूण ९७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.
संध्याकाळी दीपिका पाटील या घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर त्यांनी ७ एप्रिल रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अश्विनी हर्षल वाघ हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहेत.