सोने-चांदी पुन्हा मोठी घसरण ; जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत खरेदीची लगबग !
जळगाव । शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी मोठी दरवाढ झाल्यानंतर गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण नोंदवली गेली. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य-पूर्वेतील तणाव आणि इराण–इस्रायल–अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या घडामोडींचा परिणाम थेट शेअर बाजार, कच्चे तेल आणि मौल्यवान धातूंच्या दरांवर दिसून येत आहे.


जळगाव बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात ३,५०० रुपयांहून अधिक वाढ झाली होती. मात्र गुरुवारी सकाळच्या सत्रात तब्बल ४,७३८ रुपयांची घसरण नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५१,२०४ रुपये इतके झाले.
त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. बुधवारी वाढ झाल्यानंतर गुरुवारी सकाळी १२,३६० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,४१,००० रुपये इतके खाली आले.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला असून गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी, पुढील काही दिवसांत सोने-चांदीच्या दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.