अचूक जनगणना ही धोरणनिर्मितीसाठी महत्वाची बाब ; जिल्हाधिकारी रोहन घुगे
तीन दिवसीय जनगणना प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
जळगाव । जनगणनेचा इतिहास इ.स.पूर्व 300 वर्षांपासून असून आजही त्यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती धोरणात्मक निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.
जनगणना संचालनालय, मुंबई व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना 2027 अनुषंगाने विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे. 23 ते 25 मार्च 2026 दरम्यान आयोजित या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.


श्री. घुगे पुढे म्हणाले की, 2011 ते 2026 या कालावधीत जनगणना प्रक्रियेत मोठे बदल झाले असून पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. नागरिकांसाठी सेल्फ-एन्युमरेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून अधिकाऱ्यांसाठी रिअल-टाइम मॉनिटरिंग, डॅशबोर्ड व गुणवत्ता नियंत्रणाची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. यामुळे प्रगणक व पर्यवेक्षकांचे काम वेळेत आणि अचूक पद्धतीने होत आहे की नाही, यावर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे.
तीन दिवसांच्या या प्रशिक्षणादरम्यान प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षकांमार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मार्च अखेरचा कालावधी इतर शासकीय कामकाजासाठी व्यस्त असला तरी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण गांभीर्याने घेऊन पूर्ण लक्षपूर्वक आत्मसात करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. “ही वर्षभर चालणारी प्रक्रिया असून प्रत्येकासाठी हा ‘वन्स इन अ लाइफटाइम’ अनुभव आहे. त्यामुळे याकडे जबाबदारी आणि संधी म्हणून पाहावे,” असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात सहायक संचालक अजय ठाकूर , जणगणना संचालनालय मुंबई व या कार्यालयाचे प्रतिनिधी विशाल दिवेकर (एस.आय.जी.आर.) हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी वैशाली चव्हाण, जिह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार , नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.