भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरण : गिरीश महाजन यांच्याकडून रुपाली चाकणकरांची थेट पाठराखण..?
जळगाव/नाशिक : नाशिकमधील कथित भोंदू ज्योतिषी अशोक खरात याला महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांवर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी संबंधित संस्थेत कार्यकारिणी सदस्य असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून तीव्र टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेरमध्ये चाकणकरांची अप्रत्यक्षपणे पाठराखण करणारे वक्तव्य केल्यानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, “महिला आयोगाच्या अध्यक्षा असूनही अशा व्यक्तीशी संबंध ठेवणे अत्यंत गंभीर प्रकार आहे.” तसेच, राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही प्रकरणावर प्रतिक्रिया देत, “महिलांचे शोषण करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकाराकडून माफीनामा का घेतला? संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे,” असा सवाल उपस्थित केला.


दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, “अशोक खरातसारखे ढोंगी साधू समाजात वावरतात, त्यांच्या अनुयायांना जबाबदार धरता येणार नाही. त्याला कडक शिक्षा मिळणे आवश्यक आहे.” असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे सामाजिक तसेच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेची सुरुवात झाली असून, भविष्यातील कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.