जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; आयोगाची आज पत्रकार परिषद
मुंबई | महापालिका निवडणूकांसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आज दुपार ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल.
जळगावसह लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे.
१२ जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे, त्यामुळे निवडणुका घेण्यात येणार आहेत. उर्वरित २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच १२ जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू होणार आहे.
पंधरा दिवसांची मुदतवाढ
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार आहे. आज सांयकाळी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.